इब्न बतूत. भाग – १

इब्न बतूत. भाग – १

जेवढा प्रवास केल्यावर एखाद्याला त्या युगाचा प्रवासी अशी पदवी देता येईल तेवढा प्रवास व्हेनीसच्या मार्कोपोलोनेच केला असेल, असे आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. पण तो मान टॅंजीएच्या इब्न बतूत ह्याच्याकडे जातो.

इब्न बतूत त्याच्या पुस्तकात त्याच्या पूर्वायुष्याबद्द्ल काहीच लिहीत नाही. कदाचित त्यावेळच्या इस्लामी सभ्यतेत ते मोडत नसेल. उपलब्ध महितीनुसार आपल्याला आज एवढे माहीत आहे की त्याला न्यायाधिशाचे शिक्षण मिळाले होते. ज्याला त्या काळात क्वादी म्हणत. इस्लामी कायद्याच्या “मालिकी” परंपरेचे शिक्षण त्याने घेतले होते. ज्या चार परंपरेतून शरियत निर्माण झाला त्यातलीच ही एक परंपरा. ह्यावरुन त्याने ह्या विषयांचा अभ्यास गुरुकडे राहून केला असणार आणि त्याने कुराणाचा अभ्यास केला असावा असा अंदाज निश्चितच बांधता येतो.

मार्कोपोलो मेल्यानंतर एकाच वर्षाने त्याने आपल्या पूर्वेच्या प्रवासास सुरुवात केली. फेज ते चीनमधील बिजिंग असा प्रवास त्याने केला. तो कसा केला आणि त्याचा मार्ग काय होता हे फारच मनोरंजक आहे. निघताना त्याने असे ठरवले होते की त्याच मार्गावरुन परत प्रवास करायचा नाही, तरीसुध्दा त्याने चारवेळा हाजची यात्रा केली. आजच्या नकाशात बघितले तर त्याने आजच्या हिशेबाने चाळीस देश ओलांडले, जवळजवळ निम्म्या लोकांचा सल्लागार म्हणून त्याने कुठल्या ना कुठल्यातरी स्वरुपात काम केले. ह्या प्रवासाच्या आठवणी त्याने ज्या पुस्तक स्वरुपात लिहून ठेवल्या त्याचे नाव आहे “रिहला” ह्यात तब्बल तो भेटलेल्या २००० माणसांची नावे नोंदवली आहेत. तुर्कस्तान, मध्य एशिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका, मालदीव, भारतातला काही भाग, ह्या भागातील त्यावेळचे लोकजीवन, कसे होते हे समजण्याचा हे पुस्तक एक विश्वासपूर्ण स्त्रोत आहे. नव्हे, काहीवेळा तर फक्त त्याच्यावरच अवलंबून रहावे लागेल. त्याने काढलेली त्यावेळच्या राजांची शब्दचित्रे, त्याच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असल्यामुळे आपण त्या काळात वावरतोय की काय असा भास होतो यात आश्चर्य ते कोणते ?

इब्न बतूतचा जन्म टॅंजीएमधे झाला. हे एक मोरोक्कोमधील त्यावेळचे महत्वाचे बंदर होते. जिब्राल्टरला जाण्यासाठी एशियामधल्या प्रवाशांना येथूनच गलबतं पकडायला लागत. जिब्राल्टरच्या पलिकडे होते ते देश म्हणजे “‍अल-ऍडालस, अरबी स्पेन म्हणजेच ग्रॅनाडा इ. देशांना जायचा बोटीचा मार्ग येथूनच होता.

वयाच्या २१ व्या वर्षी इब्न बतूतने अत्यंत अनुकूल अशा परिस्थितीत आपला प्रवास सुरु केला. अनुकूल अशासाठी की त्याच सुमारास, इस्लामी जगतात, “उम्माह” ह्या कल्पनेचा प्रखरतेने प्रचार होऊन, त्यांच्या अख्ख्या जगात एकतेची एक लाटच जणू पसरली होती. सर्व मुसलमान जाती व मतभेद विसरुन एका झेंड्याखाली एक होऊन जगावर राज्य करायला निघाले होते. इस्लाम त्यावेळचा एक प्रमुख धर्म होता. रोमच्या पाडावानंतर ते युरोपियन लोक व्यापारासाठी बाहेर पडले तोपर्यंत म्हणजे जवळजवळ ८०० वर्षे तो एक पुढारलेला धर्म समजला जायचा. शास्त्र, व्यापार, कला, राज्यशास्त्र, कायदा आणि साहित्य ह्या सर्वांमधे आणि त्याच्या शाखांमधे त्या काळात मुसलमानांचे योगदान मानवाला कधीच विसरता येणार नाही. आपल्याला येथे भारतात जेथे आपल्या इतिहासापलिकडे आपण बघतसुद्धा नाही त्यांना हे कळणे जरा अवघडच आहे.

थोडक्यात काय १४व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा युरोपातील रक्तपात आणि उपासमारीने थैमान घातले होते त्या काळात दारेसलाममधे म्हणजेच इस्लामी जगतामधे सोन्याचा धूर निघत होता. बारा एक मुसलमान पंथ गुण्यागोविंदाने नांदत होते. कुराणातील तत्वांवर आधारित हे पंथ ही तत्वं मोकळ्या मनाने त्यांची देवाणघेवाण करत पुढे जात होते. ह्या सर्व पंथांमधल्या अनेक वैद्य, कलाकार, वास्तुविशारद, कारागीर, तत्वज्ञानी ह्यांचा एकामेकांशी संबंध येऊन त्याचा ह्या शास्त्रांना फायदाच होत होता. तो काळ सुंदर आणि भव्य इमारतींचा होता. ह्या इमारतीत मशिदी होत्या तशीच वाचनालयं पण होती. असा काळ, की ज्यात विद्वत्तेला मान होता आणि मुसलमानांच्या एक छत्री अंमलाखाली स्थैर्य होते. याच काळात त्यांच्या कायद्याने माणसे भरकटणार नाहीत ह्याची खात्री दिली होती. आजच्या काळात आपण ज्याला हुंडी, चेक, वगैरे म्हणतो त्याची सुरुवात तेथील व्यापार्‍यांनी केली ती त्याच काळात. इब्न बतूत ह्या काळाचा एकमेव साक्षीदार आहे ज्याने हे सर्व उघड्या डोळ्याने बघितले. नुसते बघतलेच नाही तर आपल्यासाठी हे त्याने लिहून ठेवले.

टॅंजिएमधे ह्या असल्या काळात “शम्स अल्‌ – दीन अबू ‘अब्दुल्ला मुहम्मद इब्न’ अब्दुल्ला इब्न मुहम्मद इब्न इब्राहीम इब्न युसूफ ‍अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतूत” ह्या आपल्या नायकाचा जन्म एका सुस्थितीत असलेल्या क्वादींच्या घराण्यात झाला. ती तारीख होती २५ फेब्रुवारी १३०५. इस्लामी पंचांगाप्रमाणे ७२३ मधे. त्याच्या नावाखेरीज त्याच्या घराण्याबद्दल आपल्याला फारच थोडे ज्ञात आहे. कारण त्याने लिहिलेले पुस्तक हा एकच मार्ग त्याच्याबद्दल माहिती मिळण्याचा आहे. पण त्याने त्या सबंध पुस्तकात स्वत:बद्दल फार म्हणजे फारच कमीवेळा लिहिले आहे. बहुधा ते खाजगी, त्यात लोकांना काय रस असणार म्हणून लिहिले नसावे. पण त्यावेळच्या उपलब्ध साहित्यावरुन आपण अंदाजा करु शकतो की त्याचे शिक्षण वयाच्या ६व्या वर्षी सुरु झाले असणार. अर्थात त्या वेळेच्या पद्धतीनुसार त्याने पहिल्यांदा कुराणाचा अभ्यास केला असणार. त्याचा वर्ग एखद्या मशिदीत किंवा त्याच्या शिक्षकाच्या घरी भरत असणार. त्याचा खर्च वक्फने झकत मधून दिला असणार हे सर्व त्या काळात तसेच होते. अर्थात त्याच्या वडिलांनी परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याच्या शिक्षकांना खिशातूनही पैसे दिले असणार हेही स्वाभाविक आहे.

१४ व्या शकतील अभ्यासक्रम फक्त कुराणाचा होता हा एक गैरसमज आहे. प्राथमिक अंकगणित अभ्यासक्रमात बंधनकारक असे, कारण त्याशिवाय, जमिनीची विभागणी, मोजणी, पैशाचा हिशेब वगैरे अशक्य होते. पण पुढील शिक्षण मात्र नीतीमत्तेचेच असे. त्याच्याएवढेच महत्वाचे अरेबिक भाषेचे व्याकरण असे. त्या भाषेत कुराण लिहिले आहे म्हणून नाही, तर टिंबक्टूपासून ते चीनचा प्रांत कॅंटनपर्यंत हीच भाषा बोलली जायची. बाकीचे विषय इतिहास,भूगोल, कायदा, युध्दशास्त्र इ. शिकवले जायचेच.

इब्न बतूतने स्वत:चे शिक्षण आणि प्रवासात मिळवलेल्या अनुभवांचा आपल्या चरितार्थासाठी फार कल्पकतेने वापर करुन घेतला. सुरवातीच्या प्रवासात त्याला सगळीकडे क्वादी म्हणून मान्यता मिळत होती त्यामुळे तो जाईल तेथे तो क्वादीचे, किंवा कायद्याचा सल्लागार म्हणून सहज काम करायचा. त्यावेळी त्याचे ग्राहक होते गावांचे प्रमुख, त्यांच्या हाताखालील कमी दर्जाचे अधिकारी. जशीजशी त्याची किर्ती पसरत गेली तशी ह्या ग्राहकांची पत वाढतच गेली. नंतर नंतर ती खलीफा, सुलतान, वझीर अशा लोकांना सल्ले देताना आढळतॊ. त्या बदल्यात ते त्याला जे धन देत असत त्याची हल्लीचे प्रवासी लेखक किंवा टी.व्ही. वर सिरीअलस करणारे स्वप्नातसुध्दा कल्पना करु शकणार नाहीत.

जयंत कुलकर्णी
भाग १ समाप्त.


Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख and tagged , , , . Bookmark the permalink.

5 Responses to इब्न बतूत. भाग – १

 1. प्रमोद देव म्हणतो आहे:

  छान. जयंतराव, एक नवीन दालन उघडलंत आपण….आमच्यासारख्यांसाठी.
  ह्या प्रवासात आम्ही नक्की सामील आहोत ह्याची खात्री बाळगा.
  एक सूचना: एशिया असे न लिहिता आशिया असे लिहिलेत तर जास्त संयुक्तिक होईल.
  आपल्या ह्या लेखन प्रपंचाला आमचा सलाम!

 2. sudeep mirza म्हणतो आहे:

  keep it up, Sir!…

  • जयंत म्हणतो आहे:

   सुदिप,
   आपण माझा ब्लॉग वेळ काढून नियमीत वाचता या बद्दल आभार. आपल्या अपेक्षा माझ्याकडून अशाच पूर्ण होतील अशी आशा आहे
   🙂
   जयंत कुलकर्णी.

 3. Smit Gade म्हणतो आहे:

  Eagerly waiting for next posts …

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s