प्लॅटो – ३८७ बी.सी

प्लॅटो – ३८७ बी.सी

कशाचाही अतिरेक झाला की तो त्या चांगल्या कल्पनेच्या मुळावर उठतो, तसे लोकशाहीचेसुध्दा आहे. लोकशाही ज्या मुळ तत्वावर उभी आहे ते मुलत:च नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरुध्द आहे. कारण निसर्गानेच माणसामाणसामधे भेद ठेवलेला आहे त्यामुळे एक माणूस दुसर्‍यावर अधिसत्ता गाजवणार हे निश्चितच आहे. मग जी दुर्बल (दुर्बलता फक्त आर्थीक नसून वैचारिकही असू शकते) माणसे या सत्ताधिशांकडून नागवली जातात, त्यांना यांना पराभूत करायचा मार्ग एकच आणि तो म्हणजे लोकशाही. हे पटायला अवघड आहे पण नीट विचार केलात तर तुम्हाला हे पटेल, पण यासाठी यावर मुलभूत विचार करण्याची तयारी पाहिजे. यात लोकशाही वाईट का चांगली हा मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा नाही तर काय झाले असावे याचा शोध घ्यायचा आहे. याचे उदाहरण आपल्याला इथे भारतातच बघायला मिळते. इथे जे संस्थानिक होते त्यांना भारताच्या स्वातंत्र्यात काडीचाही रस नव्ह्ता ( एक औंधचे संस्थान सोडल्यास.). पण या संस्थानातल्या सर्व जनतेला स्वातंत्र्य पाहिजे होते याचे कारण त्यानंतर त्यांना या सत्ताधिशांवर लोकशाहीमार्गांने राज्य करता येणार होते. (अर्थात स्वातंत्र्यासाठी फक्त हेच कारण नसून इतरही कारणे होतीच. वरचा विचार हा समाजाच्या दोन वर्गांच्या दृष्टीकोनातून केला गेला आहे, एक सबल आणि दुसरा दुर्बल). असो.
प्लॅटो म्हणतो ” दुर्बलांचा सबलांवरचा ह्या विजयाचा शेवट अशा तर्‍हेने लोकशाहीत होतो. या तत्वज्ञानाचे मुळ तत्व म्हणजे लोकशाहीत प्रत्येक माणसाला त्या सरकारचे धोरण ठरवायचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अधिकार दिलेला आहे. एवढंच काय त्यासाठी तो निवडूनही येऊ शकतो. वरवर दिसायला ही कल्पना फारच रम्य व आदर्श वाटते पण लवकरच आपला भ्रमनिरास होतो कारण ही राज्यपध्दती राबवायला जी खर्‍या अर्थाने सुशिक्षित जनता लागते त्या लोकसंख्येचा पूर्णपणे आभाव. आता सुशिक्षित म्हणजे काय हेही ठरवायला लागेल. (अगदी कमीतकमी शब्दात व वैचारिक जंजाळात न अडकता आपण सुशिक्षितपणाची लक्षणे ठरवू शकतो. पहिले म्हणजे चांगले आणि वाईट याच्यातला फरक त्या माणसाला कळायला पाहिजे, दुसरे – चांगले तेच निवडायचे धाडस त्याच्या अंगी पाहिजे. ३- त्याची सामाजिक आणि राष्ट्रीय नैतिकता अत्यंत उच्च दर्जाची पाहिजे). दुर्दैवाने आज बहूसंख्य जनता यात मोडते असे वाटत नाही.सर्वोत्तम राज्यकर्ते निवडून आणण्यासाठी आणि राष्ट्रहीताचे व समाजहीताचे धोरण स्विकारण्यासाठी जो शहाणपणा अंगी असावा लागतो तो त्यांच्या ठायी नसतो आणि दुर्दैवाने त्यांचे तेवढे शिक्षणही झालेले नसते. त्यांचे बेजबाबदार, स्वार्थी नेते जे त्यांना वारंवार सांगतात तेच ही जनता बोलू लागते. एखादे धोरण चांगले का वाईट आहे हे ठरवण्यासाठी त्या टिकेला किंवा स्तुतीला प्रसिध्दीची जोड दिली की त्यांचा म्हणजे पुढार्‍यांचा कार्यभाग साधतो. जे सरकार जनता चालवते त्याची वाटचाल खवळलेल्या सागरातील नौकेप्रमाणे चालू असते. प्रत्येक प्रक्षोभक भाषणांबरोबर ही नौका खालीवर होत असते. या अशा लोकशाहीचा शेवट ह गुलामगिरीत किंवा एकसत्ताक राज्यपध्दतीत होतो. लोकांचा अनुनय केल्याशिवाय निवडून येता येत नाही, त्या मुळे जनतेला खुष ठेवण्याशिवाय गत्यंतर नसते. याची एकदा सवय जनतेला लागली की हे राज्यकर्ते स्वत:ला जनतेचे तारणहार (तारण संपवणारा, कर्जे माफ करणारा) व उध्दारकर्ते समजून या जनतेचे अनभिशीक्त राजे होतात. अनेक देशांच्या इतिहासात डोकावले असता आपल्याला हेच बघायला मिळेल.

प्लॅटो जसजसा यावर जास्त विचार करायला लागला तसा तो जास्तच चक्रावून गेला. त्याला खरा धक्का बसला तो माणसांच्या/समाजाच्या बेफिकीरीने. जमावाच्या लहरीवर आणि त्याच्या भोळेपणावर राज्यकर्ते निवडायचे काम तो समाज कसा काय सोडू शकतो याचा त्याला फारच विस्मय वाटला. त्याच्याही पुढे जाऊन श्रीमंतांच्या हिताचे संरक्षण करणार्‍या, धोरणे राबवीणार्‍या मुठभर सनदी आधिकार्‍यांच्या हातात हे काम देणार्‍या समाजाचे त्याला आश्चर्य वाटत असे. या लोकांच्या हातात हे काम गेले की लोकशाहीच्या मागे लपून आपल्याला पाहिजे त्या लोकांना सत्तेवर बसवायला त्यांना काहीच अवघड जाणार नाही हे वास्तव प्लॅटोने जाणले होते.

असल्या जमावावर टीका करताना प्लॅटो म्हणतो “आपल्याला एखादे पादत्राण तयार करायचे असल्यास गावात हे काम कोण उत्कृष्ट करु शकेल याची पूर्ण चौकशी आपण करतो. हे काम येणार्‍या माणसालाच आपण हे काम देतो. मात्र लोकशाहीमधे आपण आपली अशी सोईस्कर समजूत करुन घेतली आहे की ज्याला जास्त मते मिळवता येतात तेच चांगली पादत्राणे करू शकतात ( राज्य करु शकतात). आपण जेव्हा आजारी पडतो त्यावेळी आपण सर्वात अनुभवी वैद्याला किंवा डॉक्टरला बोलावतो. गावातल्या सगळ्यात सुंदर वैद्याला नाही किंवा ज्याला उत्तम भाषण करता येते अशा डॉक्टरलाही नाही. जेव्हा राज्यावर कठीण प्रसंग कोसळतात, तेव्हा आपण कोणाला बोलवायला पाहिजे ? राजकारण्यांना का या समाजातील तज्ञांना जे या प्रसंगावर मात करु शकतील.”

राज्यकर्ते म्हणून नालायक माणसे येणार नाहीत आणि खरा लोककल्याणकर्ता राज्यकर्ता यावा यासाठी काय करावे लागेल हाच समाज आणि तत्वज्ञानींसमोरील खरा प्रश्न आणि आव्हान आहे.

एका नालायक राजाला लाथ घालून हाकलून देणे मला वाटते ५६० लोकांना काढण्याच्या तुलनेने सोपे असावे —    -त्या काळी.

पण दुसरेही आहे, शिवछत्रपतींसारखे राजे मिळवायचे कुठे आणि कसे ?
हा लेख प्लॅटोच्या विचारावर आधारीत आहे. लेखक याचाशी सहमत असेलच असे नाही

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in राजकीय. Bookmark the permalink.

2 Responses to प्लॅटो – ३८७ बी.सी

 1. Keshav म्हणतो आहे:

  जयंतराव,
  तुमचा हा लोकशाहीवरचा लेख विचार करायला लावणारा आहे. आपल्या देशात तरी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या भारत बंदचेच बघा ना. सरकारला माहित होते की बसेस चालवल्या तर काय होईल, तरी त्यांनी चालवल्या. विरोधी पक्षांच्या बेजबाबदारपणाबद्द्ल तर बोलावे ते थोडेच आहे. हेच भाजपावाले पेट्रोलच्या किंमती फ्लोटिंग ठेवायच्या असे म्हणत होते.
  सर्वत्र केवळ लोकानुनय, तसेच अर्धशिक्षित जनतेची फसवणुक, आपली पोळी भाजून घेणे हे प्रकार मन उद्विग्न करत आहेत.
  मूरखको तुम राज दियत हो
  पंडित फिरत भिकारी
  यापेक्षाही भयानक स्थिती आहे. अनेक लोक कोणी ईश्वरी अवतार आपल्याला तारेल या भ्रमात बसले आहेत. याचा शेवट तुमच्या लेखात लिहिल्याप्रमाणेच होईल अशी साधार भीति वाटते.

 2. रोहन चौधरी म्हणतो आहे:

  आपला लेख पूर्णपणे पटणारा आहे. प्रत्येक गोष्टीला २ बाजू असतात. माझ्यामते लोकशाही संदर्भातली चांगली बाजू कधीच उघडी पडलेली आहे. आता फक्त लोकशाहीच्या दुसऱ्या वाईट बाजूचा वापर सुरु आहे. अर्थात प्रत्येक गोष्ट बदलायला जसा त्यात वेळोवेळी बदल घडणे/घडवून आणणे आवश्यक असते तेच लोकशाहीला सुद्धा लागू आहे.

  ‘शिवछत्रपतींसारखे राजे असते तर लोकशाहीची गरज कधीच भासली नसती… असो आजच्या एका राजकारणी माणसात त्यांच्या तुलनेने नखाच्या १/१००० भाग जरी लाभला तरी फायदाच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s