सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.

सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.

मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्‍या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता. तो मेलेलाच बरा असे लोकशाहीवाद्यांचे पुढारी एनिटस आणि मेलिटस यांचे म्हणणे पडले.

उरलेली पुढची हकीकत सर्व जगाला माहीतच आहे. त्याच्या लाडक्या शिष्याने, प्लॅटोने ती हकीकत काव्यापेक्षाही सुंदर अशा गद्यात लिहून ठेवली आहे. आपलं नशीब, जगातील त्या भागातील पहिल्या तत्ववेत्त्याचे बलिदान, त्याने दया मागायला नकार, सुटण्यासाठी लाच द्यायला नकार, हे सर्व प्लॅटोने आपल्यासाठी लिहून ठेवले आहे. लोकशाहीवाद्यांकडे त्याला माफ़ी देण्याची ताकद असताना, त्यांनी सांगितला तसा अर्ज करायला त्याने स्पष्ट नकार दिला. बाहेर त्याच्या मृत्यूची मागणी करणार्‍या झुंडीच्या घोषणांच्या विरुध्द त्यांच्याच न्यायाधिशांनी त्याला सोडून द्यायची इच्छा व्यक्त केली हा त्याचे सिध्दांत बरोबर होते याचा पुरावाच म्हणावा लागेल. सध्याच्या राजकारणामधे जे चालले आहे त्यात आपले लाचार मंत्री तत्वासाठी आपली खुर्चीही सोडत नाहीत हे बघता सॉक्रेटीसचे मोठेपण आपल्या लक्षात यायला हरकत नाही.

त्याने वीष पिऊन आपली जीवनयात्रा संपवावी असा आदेश लोकशाहीवाद्यांच्या पुढार्‍यांनी काढला. सॉक्रेएटीसचे सगळे मित्र जे त्याचे विद्यार्थीपण होते, तुरुंगात जमा झाले. त्यांनी आल्याआल्या त्याला असा सल्ला दिला की तो अजूनही येथून सुटू शकतो….. त्यांनी तुरुंगाच्या सगळ्या अधिकार्‍यांना लाच देऊन फितवले होते. सॉक्रेटीसने या सुचनेला नम्रपणे नकार दिला आणि त्याच्या चिंताग्रस्त मित्रांना म्हणाला “तुम्ही सर्वजण मला आनंदाने निरोप द्या, आणि असे समजा की तुम्ही सॉक्रेटीसचे शरीर पुरत आहात त्याचे विचार मात्र जिवंतच आहेत. असं म्हणून तो…..
(खालील वर्णन प्लॅटोच्या शब्दात…….)
शांतपणे उठला आणि क्रिटोबरोबर स्नानगृहात गेला. क्रिटोने आम्हाल तेथेच थांबण्याची खूण केली आणि आम्ही तेथेच थांबलो. आमच्या मनात आणि ओठावर तीव्र दु:खाशिवाय काहीच नव्हते. सॉक्रेटीस आम्हाला आमच्या वडिलांसारखा होता आणि त्याच्याशिवाय उरलेले आयुष्य काढायचे म्हणजे अनाथांसारखेच जगणे ! सूर्यास्ताच्या खुणा क्षितिजावर दिसायला लागल्यावर तो परत आमच्यात येऊन बसला. कोणीच काहीच बोलत नव्हते. असाच काही वेळ गेल्यावर त्या तुरूंगाचा प्रमुख आला आणि सॉक्रेटीस समोर नम्रपणे हात बांधून उभा राहिला.
“हे सॉक्रेटीस, या तुरूंगात आत्तापर्यंत आलेल्या लोकांमधे तुझ्याइतका सभ्य आणि थोर मनाचा माणूस मी आजवर बघितलेला नाही. माझे कर्तव्य पार पाडताना मी येथे अनेक लोकांना मृत्यू दिलेला आहे, आणि त्यांचे शिव्याशाप पण ऐकलेले आहेत. अर्थात त्यासाठी मी त्यांना दोष देत नाही. पण मला खात्री आहे तुझ्या बाबतीत असले काही घडणार नाही. आता तुझ्या बाबतीत जे काही घडणार आहे त्याबद्दल तू माझ्यावर रागावणार नाहीस अशी मला आशा आहे, कारण जे काही घडणार आहे त्यात माझा काहीच दोष नाही हे तुला चांगलंच माहीत आहे. तुझा या पुढचा प्रवास सुखाचा होवो आणि देव तुला हे सगळे सहन करण्याची शक्ती देवो. या प्रकारात मी फक्त एक निरोप्या आहे याबद्दल तुझ्या मनात काही शंका नसावी.” असे म्हणतानाच त्याच्या मनाचा बांध फुटला. भिंतीचा आधार घेत तो तसाच माघारी जाऊ लागला. त्याच्याकडे बघत सॉक्रेटीस म्हणाला “मी तुझ्या शुभेच्छांचा आनंदाने स्विकार करतो आणि तुलाही शुभेच्छा देतो. तुला जसे सांगितले गेले आहे तसेच तू कर. माझी अजिबात चिंता करू नकोस.”

मग आमच्याकडे वळून सॉक्रेटीस म्हणाला ” बघा हा माणूस किती प्रामाणिक आणि साधा आहे ! मी तुरुंगात असताना तो नेहमी मला भेटायला येत असे आणि त्याला माझ्या मृत्यूचे खरेच दु:ख झालेले दिसतंय ! पण त्या बिचार्‍याला यातून लवकर सोडवायचे असेल तर त्यांना तो विषाचा प्याला आणायला सांगा. ते वीष तयार नसेल, तर त्यांना ते तयार करायला सांगा.”
ते ऐकून क्रिटो म्हणाला ” एवढी काय घाई आहे ? अजून तर सूर्य मावळला पण नाही आणि येथे येणारा प्रत्येकजण तो प्रसंग पुढे ढकलायचा प्रयत्न करतोच. त्यासाठी काय काय कारणे सांगतात ते. जेवायचे आहे, शेवटचे मद्य प्यायचे आहे………त्यामुळे तुलाच घाई करायचे कारण नाही. अजून बराच वेळ आहे”.
सॉक्रेटीस म्हणाला ” तू ज्यांच्या विषयी बोलत आहेस त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असेलही कदाचित. उशीर झाल्यामुळे त्यांना काय फायदा होतो कोणास ठाऊक; पण तसले काहीही करण्याचा माझा विचार नाही आणि तेच बरोबर आहे असे मला वाटते. ते वीष थोडेसे उशीरा पिण्यामुळे, असलाच तर, कसलाही फायदा करून घ्यायची मला यत्किंचितही इच्छा नाही. जो जीव थोड्यावेळाने जाणारच आहे, त्याला थोड्यावेळ वाचवून काय मिळणार आहे ? मला माझेच हसे करून घ्यायचे नाही. तेव्हा कृपा करून माझे ऐका, नाही म्हणू नका.”
त्याचे ते बोलणे ऐकून क्रिटोने नोकराला खूण केली आणि ते दोघेजण आतल्या खोलीत गेले. बराच वेळ ते बाहेर आले नाहीत. थोड्यावेळाने तुरुंग आधिकार्‍याबरोबर ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात विषाचा प्याला होता. सॉक्रेटीस त्याला म्हणाला ” माझ्या मित्रा, तुझा असल्या बाबींमधे अनुभव दांडगा आहे. तूच मला हे वीष घेण्याबाबत मार्गदर्शन कर”.
तुरुंग अधिकारी तो पेला सॉक्रेटीसच्या हातात देत म्हणाला ” त्यात अवघड असं काही नाही. हा प्याला प्यायल्यावर तुम्हाला या इथेच थोड्या येरझार्‍या घालाव्या लागतील. जेव्हा तुमचे पाय जड होतील तेव्हा या बिछान्यावर तुला फक्त पडायचं आहे. बाकीचे काम मग ते वीष करेलच.”
सॉक्रेटीसने तो पेला अगदी सहजपणे पण काळजीपूर्वक त्याच्या हातातून घेतला. त्याच्या चेहर्‍यावरच्या भावात कसलाही बदल आम्हाला तरी जाणवला नाही. तो शांतपणे त्या अधिकार्‍याच्या डोळ्यात बघत त्याला म्हणाला “मी या विषाचा देवाला नैवेद्य दाखवू शकतो का ? तुझे काय म्हणणे आहे? मी दाखवू का नको? त्या अधिकार्‍याच्या चेहर्‍यावरचे आश्चर्य लपून राहिले नाही.
“आमचे काम जेवढे लागेल तेवढे वीष करायचे. यापेक्षा आधिक काय सांगू मी ?”
“मी तुझे म्हणणे समजू शकतो. पण मला देवाची प्रार्थना केलीच पाहिजे आणि त्या दुसर्‍या जगाच्या प्रवासासाठी त्याचे आशिर्वाद घेतलेच पाहिजेत.”
“देवा ! आता हीच माझी प्रार्थना आणि नैवेद्य समज !” असे म्हणून सॉक्रेटीसने तो विषाचा प्याला सहजपणे ओठाला लावला आणि त्यातले विष आनंदाने पिऊन टाकले.

आत्तापर्यंत आम्ही आमच्या भावनांवर आणि दु:खावर मोठ्या मुष्किलीने ताबा ठेवला होता, पण त्याला वीष पिताना बघून आमचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला. त्याचे वीष पिऊन संपल्यावर तर आमच्या दु:खाला पारावार राहिला नाही. माझ्यासकट सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वहायला लागले. ते दिसू नयेत म्हणून मी माझा चेहरा माझ्या दोन्ही हातांनी झाकून घेतला आणि त्यांच्या आड मी माझ्याच नशिबावर रडू लागलो, त्या महामानवाच्या नशिबावर नव्हे. असला मित्र व सोबत आता नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय ? ही अवस्था, माझी एकट्याचीच नव्हे तर सर्वांचीच झाली होती. क्रिटोचे दु:ख इतके अनावर झाले की तो तेथून उठून बाजूला झाला. मीही त्याच्यामागे गेलो आणि नेमके त्याच वेळी एपोलोडोरसचे दु:ख अनावर होऊन त्याच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला. तो जोरजोरात रडायला लागला. त्याचे ते रडणे ऐकूनआमच्यासारख्यांच्या जीवाचासुध्दा थरकाप उडाला. सॉक्रेटीस मात्र शांत होता.

“हा विचित्र आवाज कसला ? मी सर्व स्त्रियांना घरी पाठवले त्याचे मुख्य कारण, त्यांच्या रडण्याचा मला त्रास झाला असता. मला वाटतं पुरूषांनी या जगाचा निरोप शांतपणेच घेतला पाहिजे. तेव्हा आता शांत रहा आणि जरा धीर धरा”
हे ऐकल्यावर मात्र आमची आम्हालाच लाज वाटली. आम्ही आमचे अश्रू आवरले. सॉक्रेटीस मात्र चालतच होता. थोड्याच वेळात सांगितल्याप्रमाणे त्याचे पाय जड झाले, मग तो त्या अधिकार्‍याने सांगितल्याप्रमाणे पाठीवर उताणा झोपला…. ज्या माणसाने त्याला वीष दिले होते त्याने त्याच्या पायाकडे नीट निरखून बघितले. त्या पायावर बोटांनी जोरात दाबून त्याने तेथे स्पर्ष होतो आहे का ते विचारले. सॉक्रेटीसने नाही म्हटल्यावर, मग त्याने हळू हळू वर वर दाबायला चालू केले. त्याची खात्री पटल्यावर त्याने आम्हाला दाखवले त्याचे पाय किती गार आणि निर्जिव होत चालले होते ते. सॉक्रेटीसला पण ते जाणवत होतेच. तो समजुतीच्या स्वरात म्हणाला ” हे वीष माझ्या ह्रदयाच्या जवळ पोहोचले की संपले सगळे”. जेव्हा त्याच्या कंबरेपर्यंत वीष भिनले तेव्हा त्याने त्याच्या तोंडावरची चादर काढली आणि तो म्हणाला “क्रिटो मी एक्लिपीयसला एक कोंबडा देणं लागतो. हे माझे कर्ज फेडायला जमेल का तुला ?”
“ती कर्जफेड होईल ! खात्री बाळग ! क्रिटो तत्परतेने म्हणाला.
“अजून काही आहे का? “क्रिटोने विचारले
या प्रश्नाला काहीच उत्तर मिळाले नाही. पण दोन तीन क्षणातच त्या चादरी खाली एक हालचाल झाली. नोकराने त्याच्या तोंडावरची चादर बाजूला केली आणि त्याच्या डोळ्यांच्या पापण्या हलक्याच मिटवल्या.

आमच्या मित्राची अखेर ही अशी झाली. असा मित्र, जो सर्वात ज्ञानी होता, न्यायी होता. असा माणूस मी तरी या विश्वात बघितला नव्हता.

प्लॅटो.

जयंत कुलकर्णी.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

One Response to सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.

  1. suma kulkarni म्हणतो आहे:

    lekh Aavadla. to mazya saptahik shreemat darshan madhe chapaycha Aahe. prvangi dayl ka? Aapla vinamra,
    suma kulkarni

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s