पोलिसचौकी -१-२-३

एका १५ऑगस्ट्ला मुलांना शाळेत सोडून घरी चाललो होतो. सगळीकडे ध्वनिवर्धकाच्या भिंती छातीत धडली भरवत होत्याच. चौकातून मुख्य रस्त्याला चाललो होतो तेवढ्यात डावीकडे नजर गेली. त्या वस्तीत मुसलमानांची बर्‍यापैकी वस्ती आहे आणि त्याच दिवशी मुसलमानांचा कसलातरी सणही आला होता त्या मुळे झेंड्याची रेलचेल होती. भगवे झेंडे, तिरंगे, चाँद असलेले हिरवे झेंडे…. झेंडेच झेंडे. त्यातच दोन खांबांवर दोन झेंडे दिमाखात फडकत असलेले बघितले. एक हिरवा आणि एक तिरंगा. यात विशेष ते काय, पण आम्हाला हौस दांडगी ना…… हिरव्या झेंड्याची उंची तिरंग्यापेक्षा जास्त होती. कायद्याने असे असणे हा गुन्हा आहे. एकदा मनात आले, त्या तिथे उभ्या असलेल्या मुस्लीम बांधवांना तेथे जाऊन या कायद्याची माहिती द्यावी…. तेवढ्यात समोरच्याच पोलिसचौकी कडे नजर गेली. म्हटलं, कायद्याच्या रक्षकांनाच कायद्याचे रक्षण करुदेत. गाडी बाजूला लावली. चौकी चढण्याचा पहिलाच प्रसंग. सरळ मनाने आत गेलो. हवालदार समोरच टेबलाच्या मागे काहीतरी लिहीत बसले होते. पुढचा संवाद खालीलप्रमाणे….

मी : नमस्कार !
पो.ह. : नमस्कार.
मी शांतपणे उभाच. बसायला सांगितले नव्हते त्यामुळे बसायचा प्रश्नच नव्हता.
पो.ह. : हं बोला काय तक्रार आहे ?
मी : आज १५ ऑगस्ट आहे….
पो.ह.: माहिती आहे… पुढे बोला.
मी एका दमात : समोर आपल्या राष्ट्रीय झेंड्याच्या बरोबर हिरवे झेंडे लावलेले आहेत..
पो.ह.: बरं मग ?
मी: त्यात तिरंग्याची उंची सगळ्यात जास्त पाहिजे असे आपला कायदा सांगतो.
पो.ह.: बरं मग ?
मी : जरा आपण बाहेर बघितलेत तर आपल्याला या कायद्याचा भंग होताना दिसेल.
पो.ह.: आपले नाव ? पेशा ? पत्ता? तक्रारीचा हा अर्ज भरा.
मी: मी भरतो हा अर्ज, पण मी दोन दिवसातच duty join करणार आहे, तेव्हा मी येथे नसणार हे कृपया आपण लक्षात घ्या.
पो.ह.: जरा थांबा आमच्या साहेबांना विचारतो….
“साहेब इथे एक माणूस आलाय…… सर्व हकिकत सांगतो… पो.ह. माझ्या हातात फोन देतो. ” हं बोला आमच्या साहेबांशी.
साहेबः तुला काही उद्योग नाही कारे ? स्वतःला काय गांधी वैगरे समजतोस की काय… का टाकू तुलाच आत, दंगलीला कारणीभूत म्हणून !
मी : मी एक सैन्यातला अधिकारी आहे आणि या झेंड्यासाठी अनेक सैनिकांनी आपले प्राण दिलेले आहेत ? अशाच अर्थाचं मी काहितरी चिडून बोललो.
साहेब : आम्ही सांगितले होते का तुम्हला सैन्यात जायला. आयची.. फुकटची कटकट साली. जरा आमच्या माणसाला फोन द्या…..
त्यांचे बोलणे झाल्यावर… काय झाले ते माहीत नाही.
पो.ह. : साहेब तुम्ही तक्रार केलीत तर तुम्ही ड्युटीला जाऊ शकणार नाही. माझं ऐका, या भानगडीत पडू नका. असा सल्ला आमच्या साहेबांनीपण दिला आहे. हे लोक फार डेंजर आहेत.
मी: आहो पण….
ह.: बरं तुम्ही जावा, मी बघतो काय करायचे ते….

मी खिन्नपणे चौकीच्या पायर्‍या उतरतो. मनात नाही नाही ते विचार यायला लागले. वाट्ले साला.. केव्हातरी गोळी लागून मरायचेच… आत्ताच याला..

त्या झेंड्यांकडे असाह्यपणे बघत गाडीत बसलो आणि गाडी सुरु करणार तेवढ्यात मनात काय आले कोणास ठाऊक, तसाच उतरलो, गाडी लॉक केली आणि त्या झेंड्यांपाशी गेलो. तेथल्याच एका गोल टोपी घातलेल्या माणसाला माझी ओळख करून दिली.
तो : हां बोलो साब… अरे साबके लिये एक चाय लाना, और थंडापानी भी….
मी: राहूदेत हो… असे म्हणुन मी त्याला त्या कायद्याची माहीती दिली.
तो: इतनाचना साब, आम्हाला तर खबरच नाही याची. अरे सलीम, जरा वो झेंडे पलटी कर देना….
सलीम : चाचा क्यों…?
तो: बादमे बताता हूं….
मी: आनंदाने “Thank You !”
खाली मान घालून मी माझ्या गाडीकडे चालायला लागलो…..

पोलीस चौकी -२
आर्मीतून बाहेर आल्यानंतर एकदा मुंबईला चाललो होतो. त्यावेळी एशियाड्ने प्रवास करायची बर्‍यापैकी क्रेझ होती. सकाळची ५.३०ची बस स्टेशनवरून सुट्णार होती. बसमधे चढ्लो, जवळ जवळ रिकामीच होती. बहूदा अजून प्रवासी यायचेच होते. खिडकीजवळ्ची एक जागा एका आजोबांनी घेतली होती. माझे आरक्षण असल्यामुळे ते उठायला लागले म्हणून मी त्यांना म्हटले ” काका बसा आपण. मी बसतो इथे”. मी वर बॅग ठेऊन त्यांच्या शेजारी जागा घेतली. नेहमी होतात तश्या गप्पा झाल्या. अजून वेळ होता म्हणून म्हटलं जरा पेपर आणावा.
मी : काका जरा सकाळ घेऊन येतो. बॅग कडे लक्ष ठेवाल का ?
काका : हो ! हो! या जाऊन.
मी गाडीतून उतरलो, बाहेर कंडक्टर उभा होताच त्याला पेपर घेऊन येतो म्हणून संगितले आणि गेलो. पेपर घेऊन आलो आणि वाचायचा चष्मा काढण्यासाठी उठलो तर काय बॅग गायब. मी त्या काकांना विचारले तर त्यांना रडूच फुटले. च्यायला आता काय करायचे याला असे म्हणून त्यांची समजूत काढायला लागलो. तो पर्यंत बस चांगलीच भरली होती आणि सगळे माझ्याकडे काय म्हातार्‍याला त्रास देतोय हा माणूस अशा नजरेने बघत होते. मी खाली उतरलो आणि कंडक्टरला या सगळ्याची कल्पना दिली आणि कंट्रोलर कडे गेलो. त्याने त्वरीत सल्ला दिला “साहेब पोलीस कंप्लेंट वगैरे काही करू नका, काही उपयोग नाही. आणि मला तर गाडी सोडावी लागेल.” मीही तोच विचार केला म्हटल मुंबईहून आल्यावर बघूयात. काम महत्वाचं होतं. बॅगेमधे एक रेबनचा गॉगल, कॅसीओची नवीन कोरी इ.डायरी, छत्री, एक जॅकेट असे सामान, गेल्यातंच जमा होते.

मुडही गेलाच होता, त्याहून त्या आजोबांची समजूत काढताना माझ्या नाकी नऊ आले. त्यांना बिचार्‍यांना फारच अपराधी वाटत होतं. संध्याकाळी मुद्दामच एशियाडनीच परत आलो आणि सरळ समोरची पोलिसचौकी गाठली.
पो.इ. : या या ! अरे साहेबांना बघरे काय पाहिजे ते. बसा साहेब थोड्यावेळ इथे. भोसले घेतील आपली कंप्लेंट लिहून. काय गेलय चोरीला ? काळजी करु नका. मिळेल तुमचे सामान.’
मी स्वतःला चिमटा काढ्ला. स्वप्नात तर नाहीना मी ? कमाल म्हणजे, भोसलेही तेवढ्यात आलेच. आल्या आल्या त्यांनी पॅड्वर एक कागद ओढला आणि तक्रार लिहून घ्यायला सुरवात केली. पुढच्या १५ मिनीटात मी चौकीच्या बाहेर होतो. मी फारच खुष होतो.

दोन /तीन महिन्याने परत मुंबईला काम निघाले. मुक्कामाला जायचे होते म्हणून दुपारीच निघालो. पोलिस चौकीत जाऊन यावे म्हणून परत एशियाडचेच आरक्षण केले. लवकर निघून पोलिसचौकीची पायरी चढलो. आत ओळखीचे कोणी दिसेना. मी एका टेबलावर जाऊन त्या अधिकार्‍याला भेटलो.
मी : माझी एक तक्रार इथे नोंदवली आहे, त्याचे काय झाले आहे त्याची चौकशी करायला आलो आहे.
साहेब : आणलीय का कॉपी ?
मी : हो ! ही घ्या.
साहेब : च्यायला, आहो ही काय तक्रार आहे की काय ? हे असलं कोणी बी लिहून आणेल. याला घेऊन काय करू ? आमच्या साहेबाला भेटा. ते बी काही करु शकणार नाही म्हणा. अहो हे असंच चालायच पूर्वी. गुन्हे कमी दाखवायला रितसर तक्रारच नोंदवून घ्यायची नाही.
मी शांतपणे त्या कागदाची घडी घातली, खिशात ठेवायला गेलो तर पाकीट गायब ! कपाळावर हात मारला आणि बाहेर पडलो.

पोलिसचौकी -३
इचलकरंजीला एका फाउंड्रीला भेठ द्यायला गेलो होतो. मी आणि माझे एक मॅनेजर श्री. इंगळे. (नाव बदललेलं आहे) जातानाच इंगळेला मागच्या हरवलेल्या बागेची गोष्ट सांगितली होती. काम संपल्यावर परत यायला एसटी स्टँडवर आलो. बसमधल्या जागांवर बसलो आणि गप्पा मारायला लागलो. गमतीने म्हटलेसुध्दा ‘बॅग बघ रे, चायला जायची.” इंगळे उठला. म्हणाला बघतोच ! शंका नको.
“कुठेय हो साहेब बॅग ?”
मला वाटलं चेष्टा करतोय.
उठून बघतो तर काय बॅग गायब. मी म्हट्ले इंगळे जाउदेत त्यात काही विशेष नव्हतेच. एक छोटी इलेक्ट्रॉनीक डायरी आणि थोडी ड्राईंग्ज. ती काय आणता येतील परत.”
“साहेब, चला उतरुया. समोरच पोलिस चौकी आहे तिथे कंप्लेंट तरी करू. बॅगनाही मिळाली तरी चालेल.”
“नकोरे बाबा,माझी फार चिडचिड होते त्या ठिकाणी. परतच जाऊया आपण.”
“साहेब तुम्ही एक शब्धी बोलू नका मग तर झालं ? मी करतो सगळं”

तो हट्टालाच पेटल्यावर माझाही नाईलाज झाला.
परत एकदा पोलिसचौकीची पायरी चढलो. या ठिकाणी खरंच पायर्‍या चढाव्या लागतात. तेथे ही गर्दी जमली होती. दोन तीन डोकी फुट्लेले गुंड आणि त्यांच्या बरोबर अनेक गुंड. जोरजोरात भरभक्कम शिवीगाळ चालली होती. आता भरपूर वेळ जाणार म्हणून मी इंगळेवरच उखडलो. माझी बडबड ऐकून बहुदा वैतागून इंगळे आत गेला आणि थोड्याच वेळात मला बोलवायला आला ” चला साहेबांनी बोलावलंय” मी मनातून म्हटले चला सुटलो ! आत गेल्यागेल्या साहेबांच्या समोर बसलो. साहेब तगडे, रुबाबदार. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या रुंद मिशांनी अजूनच रोखठोक झाले होते. आम्ही त्यांच्यासमोर बसल्यावर साहेब म्हणाले ” हं बोला काय काम आहे?
“साहेब यांची बॅग चोरीला गेली आहे” इंगळे.
“मग यांना बोलायला काय झालं ? साहेब.
“माझी बॅग एसटी स्टँड्वर बस मधून चोरीला गेली. त्याची तक्रार नोंदवायला आलो आहे.” मी.
तेवढ्यात बाहेर एकच गोंधळ झाला आणि एक पुढारी छाप दिसणारा गुंड आत शिव्या देतच शिरला.” कुठयं तो …वा साहेब माझ्या माणसाची तक्रार नोंदवत नाही काय साला……. परत शिव्यांचा भडिमार…
त्याला बघताच साहेब तत्परतेने जागेवरुन उठले आणि त्यांना सामोरे गेले. माननीयांचा आवाजही खाली आला. बहुदा ते सगळे नाटकच असावे.. जनतेसमोर !
१० मिनीटाने साहेब परत आले आणि त्यांनी आमच्याकडे मोर्चा वळवला.
“हं बोला.”

इंगळेने परत सगळे सांगितले.
” तुम्ही सुशिक्षित माणसे. तुम्हीच अशा बॅगा हरवायला लागल्यावे अडाण्यांना काय नावे ठेवायची ? तरी बरे स्टँड्वर सगळीकडे सामान सांभाळा अशा पाट्या लावल्या आहेत. एक बॅग सांभाळता येत नाही. आम्हाला काय एवढाच उद्योग आहे का ? अगोदरच माणसं कमी आणि तुमच्या बॅगा. कोण शोधणार त्या ? एवढी शहानी माणसं तुम्ही ?
” अहो साहेब बॅग चोरीला गेली आहे आम्ही हरवली नाही.” इंगळे.
“कसला बावळटपणा ! साधे बॅगवर लक्ष ठेवता येत नाही तुम्हला”. साहेब. इंगळे काय बोलावे हे न उमजून गप्प बसला. आता मात्र मला गप्प बसवेना.
” त्याचं असं आहे साहेब, हा आपला समाज आहेना, सर्व प्रकारच्या माणसांनी बनला आहे. त्यात चोर आहेत, बदमाश आहेत…
“तेच म्हणतो मी. आपण आपली काळजी घेतली पाहिजे की नको ऽ” माझे वाक्य अर्धवट तोडत साहेब म्हणाले.
“आपल्यासारखे हुशार, धडाडीचे, धाडसी लोकही आहेत, आमच्यासारखे बावळट, मुर्ख, साधे सरळही त्यात आहेत. आता आमच्यासारख्यांचे या चोरांपासून संरक्षण कोण करणार ? म्हणून सरकारने काय केले आहे माहिती आहे का ? आमच्यासारखे जे बावळट लोक आहेतना लाखो रुपये मिळवणारे, त्यांच्या कडून पैसे घेऊन सरकारने आपल्यासारख्या हुषार लोकांना पगार देऊन आमचे संरक्षण करायला ठेवले आहे. समजते आहे का मी काय म्हणतोय ते ? का अजून नीट समजावून सांगू? मी म्हणालो.

तुम्ही काय म्हणताय ते समजतंय मला साहेब

तुम्हाला समजतंय हो सगळे पण वळत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे. चला इंगळे याच्या हातून काही व्हायचे नाही. मी. असे म्हणून मी बाहेर पडलो. बिचारा इंगळेही माझ्या मागे मान खाली घालून बाहेर पडला.

काही दिवसांनी पोस्टमनने एक पोस्टकार्ड दिले. पोस्टकार्ड कोणाचे बाबा…. असा विचार करत नजर फिरवली तर ते इचलकरंजीच्या एस्‌ टी डेपोतून आलेले होते.
विषय : सांडमाल सापडण्याबाबत…..
आपली बॅग एस्‍ टी स्टॅंडमधे सापडली आहे. आत सापडलेल्या पत्यावरुन आपणाला हे पत्र….. ओळख पटवून …. इ…

आमच्या त्या व्हेंडर कडून ती बॅग परत मिळवली. हातात आल्या आल्या उत्सुकतेने उघडली तर आतले सर्व सामान जसेच्या तसेच. इ-डायरी पण. म्हटल चला पत्ते/फोन नं तर मिळाले. ती डायरी चालू केली तर एकही कॉंटॅक्ट दिसेना… अरेच्चा ! होता पण एक नं. होता….

Name : Babu Sorry !

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

One Response to पोलिसचौकी -१-२-३

  1. Amolkumar म्हणतो आहे:

    98% police are corrupt.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s