आपण मूर्खात मोडतो का शहाण्यात ?


“जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो. आणि जो विश्लेषण न करता विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो.””

-डॉ. अब्राहम टी कोवूर.

डॉ. अब्राहम टी. कोवूर हे एक स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व होते. ते एक बुध्दिप्रामाण्यवादी आणि अत्यंत बुध्दीमान असे, मानसोपचार तज्ञ म्हणून ओळखले जायचे, मूळचे ते भारतातले. केरळमधून नंतर ते श्रीलंकेत स्थायिक झाले. श्रीलंकेत ते “Rationalist Society Of Sri Lanka” ह्या संस्थेचे अध्यक्ष होते. त्या दरम्यान त्यांच्या आणि डॉ. कार्लो फोन्सेका ह्यांच्या वैचारिक चर्चा वारंवार थर्स्टन कॉलेज येथे होत. ह्या चर्चेतून व अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर त्या दोघांनी एक निष्कर्ष काढला की दैवी चमत्कार, अनैसर्गिक शक्ती, आणि अध्यात्मिक चमत्कार ह्यात काहीही सत्य व वस्तुनिष्टता नाही.

त्या काळात ते जगातले एक्मेव असे मनोवैज्ञानिक होते की ज्यांना मिनेसोटा विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली होती. त्यात त्यांचा विषय होता “मानसशास्त्र आणि अतींद्रीय शक्ती”.

श्रीलंकेत अजूनही ते जाहीररित्या कसे भोंदू श्रीसत्यसाईबाबा महाराजांप्रमाणे हातातून राख काढून दाखवत ह्याच्या आठवणी सांगतात. ते खात्री देत असत की कोणालाही दैवी शक्ती नसते आणि कोणालाही नव्हती. जे म्हणतात की त्यांना ती आहे ते एक तर ढोंगी असतात किंवा मनोरुग्ण असतात. दैवी शक्ती ह्या फक्त पुराण कथांमधेच आढळतात.

डॉ. कोवूर यांनी समस्त जनतेला शहाणे करायचे व्रत घेतले होते. त्यांचे एकच ध्येय होते ते म्हणजे बुध्दीप्रामाण्यवादी समाज. त्यांचा जन्म केरळमधे एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे वडील रे. कोवूर हे एका सिरीयन चर्चचे प्रमुख होते. प्राथमिक शिक्षण त्यांनी चर्चच्या शाळेत पूर्ण केले आणि उच्चशिक्षण कलकत्त्याच्या बंगवासी कॉलेजमधे पूर्ण केले. त्यांच्या अभ्यासाचे विषय होते वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र, अमेरिकेच्या भारतीय समुद्रातील अभ्यास मोहिमेतील ते ह्या खंडातले एकमेव शास्त्रज्ञ होते.

डॉ. कोवूरांना बौध्द धर्मामधे आढळणार्‍या बुध्दीप्रामाण्यामुळे त्याची ओढ होती. त्यांच्या मते बुध्द हा एक बंडखोर होता आणि त्याने हिंदू धर्मातील स्वमताग्रहाविरुध्द बंड पुकारुन सामान्य जनतेला बुध्दीप्रामाण्याचे धडे दिले. तसेच त्याने लोकांना उदारमतवादी व्हायला शिकवले. त्यांनी नंतरच्या काळात ख्रिश्चनधर्म पण नाकारला कारण त्यांच्या बुध्दीला बायबल हे सर्वज्ञ परमेश्वराचे शब्द आहेत हे काही पटले नाही. जसजसे त्यांचे ह्या विषयावरचे विचार पक्के होत गेले तसतसे त्यांनी बुध्दीप्रामाण्यवाद हेच त्यांचे तत्वज्ञान म्हणून स्विकारले.

त्यांचा मृत्यू सप्टेंबर १८, १९७८ रोजी म्हणजे बरोबर ३१ वर्षांपूर्वी कोलंबो येथे वयाच्या ८०व्या वर्षी झाला.

आता ज्योतिषशास्त्रावर डॉ. कोवूर काय म्हणतात ते थोडक्यात बघूया ! कारण मंगळ या ग्रहाने अनेक भारतीयांचे आयुष्य धुळीस मिळवले आहे आणि ते काम तो अजूनही जोमाने करतोय, मंगळावरचा माणूस (सिनेमात दाखवले जातात तसले) सुध्दा भारतीयांचे एवढे नुकसान करु शकणार नाही.

एका विद्वान गृहस्थांनी एका प्रतिष्ठीत इंग्रजी वर्तमानपत्रात एक लेख लिहिला होता त्यात त्यांनी म्हटले होते की ज्योतिषशास्त्राची एक अंधश्रध्दा म्हणून हेटाळणी, जोपर्यंत त्याची मुलभूत परीक्षा शास्त्रज्ञ करत नाहीत तोपर्यंत थांबवावी. थोडक्यात त्यांनी मोठ्या चलाखीने ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांवर टाकली. त्या लेखात त्यांनी असेही म्हटले होते की हे एक अनेक युगे चालत आलेले प्राचीन शास्त्र आहे आणि ह्याच्यावर अनेक थोर शास्त्रज्ञांचा विश्वास होता आणि आहे. ज्योतिषशास्त्राला पाठिंबा देत त्यांनी लिहिले “१४व्या शतकात पश्चिम युरोपमधे विशेषत: पॅरिस, बोलोना, आणि फ्लॉरेन्स इ. शहरातल्या विद्यापिठात ज्योतिषशास्त्राचे विभाग होते. सर्व प्रगत देशातील (अमेरिका) लोक आजही एकमेकांना आपली रास विचारतात. ज्योतिषशास्त्रावर सगळ्यात जास्त ग्रंथाची निर्मिती अजूनही होत अस्ते. हे नाकारण्यात अर्थ नाही की आजही शास्त्रज्ञ ज्योतिषशास्त्राला लागणारी माहिती गोळा करत आहेत आणि एक दिवस हेच शास्त्रज्ञ ज्योतिषशास्त्र हे एक इतर शास्त्रांसारखे शास्त्र आहे हे सिध्द करतील. प्रो. जुंग हे एक थोर शास्त्रज्ञ होते आणि त्यांचा गाढ विश्वास ज्योतिषशास्त्रावर होता हेच उदा.पुरेसे बोलके आहे. ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र नाही हे सिध्द करण्याचा कोणीही प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही. त्याच्यावर अंधश्रध्दा म्हणून शिक्कामोर्तब करण्याअगोदर हयावर मुलभूत स्वरुपाचे काम करुन ती अंधश्रध्दा आहे का नाही हे ठरवणे हे योग्य ठरेल.”

हा लेख बराच शास्त्रीय भाषा वापरुन लिहिला असल्यामुळे सामान्य जनतेला जे लिहिले आहे ते सर्व खरे आहे असे वाटण्याचा संभव होता. म्हणून डॉ.कोवूर ह्यांनी त्याच वर्तमानपत्रात त्याला सडेतोड उत्तर दिले त्याचा गोषवारा खाली दिलेला आहे.

चुकीची विचारधारा.

आमचे विद्वान ज्योतिषमित्रांना हे समजायला पाहिजे की एखादी चुकीची विचारधारणा बहुसंख्य जनता किंवा थोर शास्त्रज्ञ त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणून बरोबर ठरत नाही. तसेच ती फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे म्हणजे ती खरी आहे असेही म्हणता येत नाही. काळाच्या ओघात असंख्य विचारधारा नष्ट पावल्या आहेत हेही ह्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे.

ज्योतिषशास्त्राचा जन्मच मुळी अशा काळात झाला आहे की मानवाला खगोलशास्त्र आणि हे विश्व ह्याविषयी अत्यंत तोकडी माहिती होती. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे अत्यंत चुकीच्या माहितीवर (डाटा) आधारलेले आहे. ज्याच्यावर ज्योतिषी एवढे अवलंबून असतात त्या नवग्रहांपैकी फक्त पाचच ग्रह आहेत. उरलेल्या चारपैकी एक तारा आहे आणि एक उपग्रह आहे. उरलेले दोन तर अस्तित्वातच नाहीत. मग ह्यावर अवलंबून राहून काढलेली अनुमाने बरोबर कशी असतील.

ज्योतिषशास्त्रातील कुंडल्या ह्या त्या माणसाच्या जन्माच्यावेळी बारा राशींमधील नवग्रहांची सापेक्ष स्थाने पाहून केलेली असतात. आता हे नवग्रह आपल्यापासून लाखो मैल दूर आहेत त्यामुळे त्यांच्या दिसणार्‍या जागा हा एक भ्रम आहे. आता कुंडल्या ह्या अस्ल्या माहितीवर आधारित असतात. जर ज्योतिषांनी खगोलशास्त्राची मदत घेऊन त्यांच्या जागा खरंच शोधून काढल्या तर माझा विश्वास आहे त्यांचाच ह्या तथाकथित शास्त्रावरचा विश्वास उडेल. ह्या ग्रह, तार्‍यांपसून निघणारा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला काही मिनिटे ते काही प्रकाशवर्षे लागतात ह्याचाच दुसरा अर्थ कुंडल्या ह्या काही मिनिटे ते हजारो प्रकाशवर्षांनी चुकीच्या असू शकतात.

न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.

आमचे विद्वान म्हणतात की ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांची आहे. हे मला मान्य नाही, तरीपण ह्याच कारणासाठी मी ज्या २३ बाबी सिध्द करण्याचे आव्हान दिले आहे त्यात ज्योतिषशास्त्र आणि हस्तसामुद्रीक हेही विषय घातले आहेत. जो ह्यातले काहीही सिध्द करुन दाखवेल त्याला श्रीलंकेचे एक लाख रुपयाचे बक्षीस मी अगोदरच जाहीर केलेले आहे. हे आव्हान प्रसिध्द करुन आता १५ वर्षे झाली आहेत. हे मी करतोय कारण ही दोन्ही मानव जातीला मिळालेल शाप आणि कलंक आहेत असे मी मानतो. ही कसोटी मी अनेक वेळा घेतलेली आहे आणि हे सिध्द केलेले आहे की ज्योतिषी, सामान्य माणसांपेक्षा वेगळे अंदाज वर्तवू शकत नाहीत. त्याच कसोटीत उतरण्यासाठी आमचे विद्वान मित्र कोणालातरी तयार करतील तर बरे होईल.

त्या परीक्षेच्या संदर्भात ते म्हणतात –

सिलोन संडे ऑब्जर्वरमधे एका लंडनस्थित श्रीलंकेच्या एका ज्योतिषाबद्दल बातमी आली की त्याने घानाच्या अध्यक्षांचा हात बघून त्यांना तेल कुठे मिळेल हे सांगितले. हा ज्योतिषी अर्थातच पैशाने फारच गब्बर झाला होता. माझ्या मनात आले की आमचे अध्यक्ष श्री जयवर्धने ह्यांनी ह्या माणसाचा उपयोग केला तर किती बरे होईल !

हे वाचल्यावर मी त्याच वर्तमानपत्रातून सदर ज्योतिषांना म्हणजे श्री सायरस आबेयाकून आणि श्रीलंकेतील तत्सम ज्योतिषांना थर्स्टन कॉलेजमधील १२ फेब्रुवारी १९७८ रोजी हॊणार्‍या कसोटीत उत्तीर्ण व्हायचे आव्हान दिले. बक्षिसाची रक्कम १ लाख होतीच. त्यांना फक्त एकच करायचे होते ते म्हणजे ९५% किंवा जास्त प्रश्नांची उत्तरे कुंडल्या आणि हातांच्या ठशांचा अभ्यास करुन बरोबर द्यायची होती. ज्यांनी ज्यांनी त्यांच्या भविष्य सांगण्याच्या कौशल्याबद्दल जाहिराती केल्या होत्या त्यांना पण ह्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवले गेले.

चार ज्योतिषांनी ह्या कसोटीत भाग घ्यायची तयारी दाखवली. पाचवे जे गृहस्थ होते त्यांनी येशूची प्रार्थना करुन आजार बरा करायचे आव्हान स्विकारले कारण तेसुध्दा माझ्या त्या २३ कसोटीमधे अंतर्भूत होते.

थर्स्टन कॉलेजचे सभागृह कार्यक्रम सुरु व्हायच्या अगोदरच गच्च भरले होते. संघ्याकाळी बरोबर ५ च्या ठोक्याला कार्यक्रम चालू झाला. अगोदर माझे प्राथमिक भाषण झाले. विषय होता “अघोरी विद्या, गूढ विद्या ह्याचा उगम व प्रवास आणि मला हे चमत्कारांच्या विरुध्द हे कायमचे आव्हान जाहीर का करावे लागले ?” हा ! त्यानंतर ज्यांनी हे आव्हान स्विकारले होते त्या सर्वांना व प्रेक्षकांपैकी अजूनही कोणाला स्विकारायचे असल्यास त्या सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करण्यात आली. ही विनंती केल्यावर फक्त एक हस्तसामुद्रीक आणि येशूची प्रार्थना करणारे गृहस्थ एवढेच व्यासपीठावर आले. जे जमले होते त्यात बरेच लोक ज्योतिषी असल्यामुळे परत एकदा विनंती करण्यात आली पण दुसरे कोणीही येण्याचे धाडस दाखवले नाही. ज्या ज्योतिषांना भविष्य सांगून १०/१५ रुपये मिळत ते एक लाख रुपये मिळवण्यासाठी का आले नाहीत ह्याच्या मागचे रहस्य मी सूज्ञ वाचकांना सांगायला नको. कारण स्पष्ट आहे. त्यांना जिंकण्याची सुतराम खात्री नव्हती आणि जर हरले. तर जे मिळतात तेही न मिळ्ण्याचीच शक्यता होती. तो धोका ते पत्करणे शक्यच नव्हते.

प्रेक्षकांमधल्याच एका सद्‌गृहस्थाला त्या दोघांबरोबर व्यासपीठावर जागा देण्यात आली. मी प्रथम त्या येशूच्या पाईकाची प्रेक्षकांना ओळख करुन दिली आणि त्याला माझ्या नाकावरची एक गाठ येशूची प्रार्थना करुन बरी करण्यास सांगितले. तसा त्याचा मला बराच त्रास होत होताच. खरं तर मी त्याला ह्यापेक्षाही अवघड आव्हान देऊ शकलो असतो कारण मी एक कॅन्सरचा रोगी होतो. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की लगेच बयोप्सी करुन प्रेक्षकांना माझा कॅन्सर बरा झालेल मी दखवू शकलो नसतो. म्हणून मी ही तशजोड स्विकारली.

येशूच्या भक्ताने त्याच्या प्रार्थना सुरु केल्यावर मी माझ्या बॅगेतून दोन लिफाफे बाहेर काढले. एकात श्रीलंकेच्या पोलिसांनी तयार केलेले दहा माणसांच्या हाताचे ठसे होते. दुसर्‍या तसल्याच बंद लिफाफ्यात त्या दहा माणसांची माहिती होती. त्यात त्यांचे लिंग आणि ते जिवंत आहेत की नाही हे नमूद केलेले होते आणि त्याच्यावर त्या पोलिस अधिकार्‍याची सही होती. दुसर्‍यात एका कागदावर त्या दहा माणसांच्या जन्म तारखा आणि वेळा दिल्या होत्या. त्यात चूक नको म्हणून त्या शेवटच्या मिनिटापर्यंत दिल्या होत्या. त्याच बरोबर त्यांच्या जन्मस्थळाचे अक्षांश रेखांश दिले होते.

तसल्याच एका लिफाफ्यात त्या माणसांचे वय, लिंग ही माहिती दिली होती अर्थात ह्याच्यावर पण त्या पोलिसांची आणि त्यातल्या दिवंगत माणसांच्या जवळच्या नातेवाईकांची सही शिक्का होताच.

मी पहिला लिफाफा आणि सगळ्यांसमोर ते दहा हाताचे ठसे ज्योतिषाला आणि नंतर त्या दुसर्‍या सामान्य माणसाला दिले. त्यांनी त्या ठशांवर तो माणसांचे लिंग आणि तो जिवंत आहे का नाही, हे लिहायचे होते.

मग प्रेक्षकातून दोन बातमीदारांना बोलावले गेले आणि त्यांना परीक्षकांचे काम दिले गेले. हस्तसामुद्रीक तज्ञाची ३०%तर दुसर्‍या माणसाची, जो ज्योतिषी नव्हता त्याची २०% उत्तरे बरोबर आली. मी जर अजून काही माणसांना व्यासपीठावर बोलावले असते तर त्यातल्या काही जणांची उत्तरे ५०% पण बरोबर आली असती. थोडक्यात काय, ज्यांना ह्या विषयाचा गंध पण नव्हता त्यांची उत्तरे ह्याच टक्केवारीत आली असती.

माझे एक लाख रुपये अजूनही माझ्याकडे सुरक्षित आहेत. ज्या लिफाफ्यात त्या १० माणसांची जन्म तारीख इ. माहिती आहे. ते मी तसेच ठेवले आहे. पुढच्या कसोटीसाठी. ह्या सर्व घटनेला वर्तमानपत्रात भरपूर प्रसिध्दी मिळाल्यामुळे एक मात्र फायदा झाला. श्रीलंकेतील बर्‍याच ज्योतिषांना आपला गाशा गुंडाळावा लागला. असले उपक्रम करुन ही बांडगुळं कमी व्हायची शक्यता कमी आहे कारण समाजामधे मूर्खांची, घाबरट लोकांची संख्या प्रचंड आहे.

मुहूर्त हा असाच एक मूर्ख प्रकार आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष श्री भंडारनायके ह्यांचा शपथविधी त्यांच्या ज्योतिषीच्या सांगण्यावरुन ३० मिनिटे चांगला मुहूर्त नसल्यामुळे पुढे ढकलला गेला. एवढ्या चांगल्या मुहूर्तावर त्यांचा शपथविधी झालातरी ते त्यांचा कार्यकाळ पुरा करु शकले नाहीत, कारण त्याच्या अगोदरच त्यांची हत्या झाली. एवढे असून भारत आणि श्रीलंका ह्या देशाचे अनेक मंत्री अजूनही मुहूर्तावर शपथ घेतात.

बी. व्ही. रामन :

माझ्या भारतातल्या चौथ्या आव्हानाच्या कार्यक्रमाच्या जरा अगोदर, मी बेंगलोरच्या एका डॉ. बी. व्ही. रामन ह्यांना पत्र लिहून ह्या कार्यक्रमात सामील व्हायची विनंती केली होती. ह्या महाशयांनीसुध्दा भविष्यावरचे मासिक चालवून, व लोकांना मूर्ख बनवून बरीच माया गोळा केली होती. मी बेंगलोरच्या आस्पास बरीच भाषणे दिली पण हे गृहस्थ काही तिकडे फिरकले नाहीत. कारण त्यातला धोका त्यांना चांगलाच माहीत आहे. मी आमच्या तज्ञ मित्र, श्री. रामन ह्यांना माझ्या पुढच्या कार्यक्रमाला येण्यासाठी तयार करवे ही विनंती करतो.

आमचे विद्वान मित्रांचे जर हे म्हणणे आहे की ज्योतिषशास्त्रावर अजून शास्त्रीय प्रयोग कोणी केला नाही तर त्यांनी हा प्रयोग स्वत: करुन बघावा आणि त्याचे अनुमान आम्हाला पाठवावे.”

डॉ.अब्राहम कोवूर म्हणतात त्याप्रमाणे आपण मूर्खात मोडतो का शहाण्यात हे आपले आपणच ठरवायला पाहिजे.

जयंत कुलकर्णी.
इंटरनेटवरुन गोळा केलेल्या माहितीवर आधारित.


About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

2 Responses to आपण मूर्खात मोडतो का शहाण्यात ?

 1. शिरीष म्हणतो आहे:

  ह्या विषयातील मी तज्ञ नाही आणिक मागील वेळेस मी लिहीलेली काही टिप्पणी आपल्याकडून प्रकाशितच झाली नाही आपल्याकडून तरीही पुन्हा प्रयत्न करतोय…

  >“जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी >पडतो. आणि जो विश्लेषण न करता विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो.””
  >
  >-डॉ. अब्राहम टी कोवूर.

  हे आवडले… मला ह्या विषयातील काही अद्भूत अनुभव आयुष्यात अनेकवेळा (काहीवेळा हे त्याचेच एक रूप) आलेत आणि मी माझ्या परीने त्याचे विश्लेषण असे केले की…
  १. प्रथम स्वतःला चिमटा काढून आपण जागृत आहोत हे पहायचे (म्हणजे दिवास्वप्न नाही)
  २. आजुबाजूच्या इतरांना आपला अनुभव किंवा पहात असलेली अतर्क्य गोष्ट तपासायला सांगायची.
  ३. सर्वानुमते ते काही अनाकलनीय असेल आणि त्याचा चमत्कार ह्या व्याख्येव्यतिरीक्त कुठलाही संदर्भ सापडत नसेल तर हे आपलाला इतवर अज्ञात परंतु ह्या सृष्टीतील सामान्य असेच काहितरी असणार म्हणून सोडून देणे..
  ह्या क्र. २ साठी साधारणतः चमत्कारावर विश्वास न ठेवणारी आसपासची माणसे असतील तर जास्त चांगली मिमांसा होते जरी उत्तर लाभले नाही तरी…

  तरीही मी स्वतः मात्र शक्ती आणि सिद्धी यांच्यावर विचारपूर्वक विश्वास ठेवणाराच आहे.
  माझ्या आयुष्यात जोवर सातत्याने आण वारंवार अनुभूती नाही भेटली तोपर्यंत मी देवळात जाऊन फुलही वाहिले नाही.

  ह्या सर्वांचा दासबोध आणिक इतर व्यावहारिक ग्रंथाच्या अभ्यास केलेल्यांनी पडताळून पहावा असा प्रयोग नक्की ठरेल कारण… “एखादी तरी ओवी अनुभवावी” ह्या विचारांचा मी… तरीही …..

  कळावे.

 2. मनोहर म्हणतो आहे:

  माझा बुद्धी कोवूरांकडेदेखील गहाण टाकण्यास विरोध आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s